एका पराभूत बेगमची अधुरी कहाणी
हमारी याद आयेगी...
मुबारक बेगम खूप आजारी आहे. तिला मदतीची नितांत गरज आहे. हा लेख काही महिन्यांपूर्वी लिहिला होता. आता तिच्या आजारपणाची बातमी कळली. लेख फेसबुकवर टाकावा असे वाटले. कुणाला तिला मदत करावी असे वाटले तर जरूर करावी. संपर्वâ : २६७८७४५९
विद्याधर चिंदरकर
आपको क्या बताऊ पेडर रोड से लिफाफा आया था , बडी उम्मीद से हमने उसे खोला. जनाब...बताओ तो, उसमे से कितने रुपय्ये निकले होंगे? आपही बताओ? आधीच मी अवघडून बसलो होतो. त्यात हा अडचणीत टाकणारा प्रश्न.
भला आप क्या बोलोगे?
माझी परिस्थिती ओळखून कडवट स्वर येतो, ‘‘जनाब ,उसमे से निकले नगद पाचसौ रुपय्ये.’’ पुढे ऐकू येतो तो विषारी हसण्याचा आवाज. ‘‘हमने भी वो पाचसौ रुपय्ये रख लिये. उनका शगुन समझकर. सुरों की मल्लिका जो ठहरी!’’
मुबारक बेगम बोलत असते.
तशी ती केवळ नावाचीच बेगम...
खरे तर मल्लिका ए गम!
काही माणसांच्या आयुष्यात सुखाचे क्षण येतात तेही दु:खाचे बोट धरूनच. मुबारकच्या तळहातावर रेषा उमटल्या त्याही अशाच उन्ह-पावसाचा गुंता घेऊन. तिला त्यांचा अर्थ ना तेव्हा कळला, ना आता उमजतोय.
जोगेश्वरीत टिपिकल मुस्लिम भागात ती राहाते. काही दिवसांपूर्वी मुबारक बेगम या नावाचे पत्र टाकायलाही पोस्टमनला प्रचंड कष्ट पडले असते, पण पेपरात तिची बातमी आली तेव्हा गरिबी आणि विस्मरणाच्या अंध:कारात खितपत पडलेल्या मुबारकवर झोत पडला. शेजारच्यांनाही कळले, पलीकडच्या अंधाNया खोलीत अल्लाने पृथ्वीवर धाडलेला एक जादुई आवाज मुक्कामाला आहे.
ती कॉलनी आणि जग एकाच वेळी जागे झाले.
अनोळखी चेहरा कॉलनीत आला की मुबारकचे घर दाखवायला कुणीतरी पुढे येऊ लागले.
गर्दी वाढली. मदतीचे हात पुढे आले.
काहींना फक्त चेहरा होता तर काही लिफाफे नाव- पत्त्यासह येऊ लागले.
मुबरकला खरंच बेगम झाल्यासारखे वाटले, पण हात पसरलेली बेगम!
त्याच पसरल्या हातात पाचशे रुपये येऊन पडतात तेही गानसम्राज्ञीकडून. बेगम उदास हसते.
बेमुर्रवत बेवफा बेगाना ए दिल आप है
आप माने या न माने मेरे कातील आप है
एकोणीसशे सहासष्ठ साली आलेल्या ‘सुशीला'मध्ये तिनेच गाऊन ठेवलेल्या ओळींनी तिच्या मनात काहूर उठते.
खिडकीतून आता संध्याकाळचा 'राखाडी' रंग घरात पसरला..
सगळ्याचीच राख झालेली, रंगांची नावंही अशीच लक्षात राहतात, राखाडी!
दाटून आलेल्या ढगांनी उगाचच उदासी वाढते.
त्या नंतर आलेला पाऊस. तो तर खूपच बेचैन करतो
पूर्वी तो मन मोहरून टाकायचा, पण...
आभाळात कुणी प्रेषित अश्रुपात तर करत नसेल ना?
उगाचच असे काहीबाही विचार येत राहतात.
मुबारक म्हणजे भावनांचा कल्लोळ.
ती अजूनही जयपूरच्या आठवणीत रमते. तिला फार काही आठवत नाही, पण जेवढे आठवते तेवढे तिला रमण्यासाठी पुरेसे असते.
माझा कार्यक्रम ठेवा ना जयपूरला!
ती विनवते...
पण आता या वयात तिला कोण ऐकणार? आवाज साफ गेलाय. प्रेमापोटी ऐकावे एवढेच. बाकी काही नाही . तिचा जन्म राजस्थानचा. त्यामुळे तिला ती ओढ आहे.
आपला आवाज अजूनही चांगला आहे हे दाखवण्यासाठी ती गाते...
कभी तनहाइयों मे यू हमारी याद आयेगी
ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनिया
तिला हे गाण्यासाठी खूप श्रम पडताहेत. आपल्याच मनात कालवाकालव होत असते.
तिला खरंच कळत नसेल? ती आता सुरात गात नाहीय ते!
ती आपल्यासाठी गातेय याची जाणीव होताच चटका लागतो.
ईश्वराचे देणे लाभलेल्या कलावंतांच्या नशिबी हे असे दुर्दैवाचे दशावतार का यावेत?
मुबारक बेगम शेकडो गाणी गायली, मग तिला पैसे मिळाले नसतील?
ती म्हणते, 'काय सांगू, पैसे कधी मिळायचे कधी बुडायचे.'
मुबारक पलंगावर बसून बोलत होती. खाली जमिनीवर पार्किन्सनने आजारी असलेली तिची मुलगी असहाय पडून होती. तिच्या कानावर बोलणे पडत असावे. तिला त्या अवस्थेत बघणे खूप क्लेशदायक होते. मुबारक पोटच्या पोरीला रोज असे बघत असते. तिला शेकडो गाण्यांचे किती पैसे मिळाले असतील, हा प्रश्न मनात आला म्हणून अपराधी वाटते .
हम हाले दिल सुनायेंगे ,सुनिये के न सुनिये
सौ बार ये दोहरायेंगे , सुनिये के न सुनिये
बेगम पुन्हा सूर लावते. अधूनमधून वैभवाच्या खुणा दिसतात... पण तेव्हढेच!
काही काळ अहमदाबादमध्ये गेल्याचे ती सांगते. तिला अजून ते दिवस आठवतात- ‘मी तेव्हा ९-१० वर्षांची असेन. सुरय्या आणि नूरजहां या माझ्या आवडत्या गायिका. मी त्यांची नक्कल कारायचे. कसे कोण जाणे, माझ्या अब्बुना वाटले, माझे गाण्यातच भले होऊ शकते. ते फळांचा ट्रक चालवायचे. माझं गाणं ऐकून ते म्हणाले, मी ट्रक चालवून थकलोय. हिचा आवाज चांगला आहे आपण मुंबईत जाऊ. बघू, हिला सिनेमात गाण्याची संधी मिळते का? त्यानंतर आम्हाला त्यांनी बडोद्यात आणले तिथे मी थोडं गाणं शिकले. नंतर आम्ही मुंबईला आलो. तिथे किराणा घराण्याचे गाणे शिकले.'
बेगम फ्लॅशबॅकमधे रमते...
सुरुवातीला मी ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये गाणं गायचे. तिथे रफ़िक़ गजनवी साहेबांनी माझं गाणं ऐकून मला सिनेमासाठी बोलावलं. त्यावेळी ते आगाजानी कश्मिरी यांचा सिनेमा करत होते, अगदी काल घडल्याप्रमाणे तिला सगळं आठवते...
‘‘रेकॉर्डिंगचा पहिला दिवस आठवतो?’’ मी विचारले.
‘'तोबा तोबा! अजूनही तो दिवस आठवला की काटा उभा रहातो,'’ मुबारक डोळे मिचकावत सांगते, ‘‘मी खूप घाबरले होते. त्या काळात रेकॉर्डिंगला बरीच माणसे येऊन बसत. त्यांना बघून भीती वाटायची आणि आवाजच फुटत नसे. सुरुवातीला तर असेच व्हायचे. गजनवी साहेबांच्या रेकॉर्डिंगला मी गाऊच शकले नाही. नंतर शामसुंदर यांनी बोलावले. तिथेही गर्दी बघून गाळण उडाली. पण नंतर एक संधी आली. मग माझ्या गुरूंचे स्मरण करून कसेबसे धाडस गोळा केले आणि लावला सूर. 'मोहे आने लगी अंगडाई, आजा आजा बालम...' चित्रपट 'आइये.' संगीतकार शौकत देहेलवी.
हे गाणं गाजलं. पण पायपीट थांबली नाही. दरबदर की ठोकरे खाणं नशिबी होतं ते तसंच सुरू राहिलं.
‘मुझको अपने गले लागा लो...' मुबारक गाण्याचा प्रयत्न करते. पण गळा साथ देत नाही. 'हे गाणं जयकिशनचं.' ती कौतुकाने सांगते. शंकर-जयकिशनबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच कल्याणजी-आनंदजी, मदनमोहन यांचा उल्लेख आवर्जून येतो. स्नेहल भाटकर हे नाव तिच्यासाठी खास असल्याचं जाणवतं.
‘हमारी याद आयेगी'च्या वेळची गोष्ट आहे, ओल्या स्वरात बेगम म्हणते, ‘‘रेकॉर्डिंग सुरू होतं. मी ‘कभी तनहाइयो में' गात होते. हरवून गेले होते. काहीतरी अद्भुत गातेय हे जाणवत होते. समोर केदार शर्मा बसले होते. तेही डोळे मिटून ऐकत होते. संगीतकार स्नेहल भाटकर शेजारीच होते. गाणं संपलं. काही क्षण कोणी काहीच बोललं नाही. अचानक केदार शर्मा उठले. बहोत खूब म्हणत त्यांनी बक्षीस म्हणून काही पैसे पुढे केले. मी बावरले. पैसे कसे घेणार? पण स्नेहल भाटकर म्हणाले, ‘घे.’ केदारजी ज्यांना असे पैसे देतात त्यांचं भाग्य उजळतं ...मी पैसे घेतले आणि खरंच माझं भाग्य उजळलं.'
‘खूप झगडल्यावर अखेर यश मिळालं . पण बNयाच काळानंतर मिळालेलं यश बराच काळ टिकलं मात्र नाही. अचानक या सगळ्याला कुणाची तरी दृष्ट लागली. 'जब जब फुल खिले'मध्ये तिचं गाणं उडालं. असंच आणखी काही गाण्याचं झालं. गाणं रेकॉर्ड व्हायचं पण रेकॉर्डवर नसायचं. किती तरी गाणी ती गायली रेकॉर्डिंगनंतर पैसेही मिळाले. प्रत्यक्षात रेकॉर्ड बाजारात यायची तेव्हा मुबारकचं गाणं नसायचं.़ फोन करून विचारलं की, तुमचे पैसे मिळाले ना? असा उलट प्रश्न यायचा. हे सतत घडू लागलं. नंतर नंतर तर कोणी गाणं घेऊनही येईना. सगळंच बदललं.’
खिडकीबाहेर अंधार गडद झालेला पण मनात साचून राहिलेला अंधकार त्याहीपेक्षा गहिरा होता. बाहेर पाऊस पडून गेलेला. हवेत गारवा होता आणि समोर जगाच्या उफराटेपणाचा कोरडा अनुभव घेऊन आलेल्या थंडपणाने बेगम तिची दर्दभरी कहाणी सांगत होती. जगाला तिचा विसर पडला होता आणि तिलाही हे निष्ठुर जग विसरायचं होतं. पण तीसुद्धा या गुंत्यात गुंतली होती. हताश मुबारक विचारते, 'मुझे वो गाना याद आ रहा है .सुनाऊ...?
तेरे दर पे हाथ खाली आये है
किसलीये तेरे करम मे देर है
फेर दे तकदीर का गर फेर है
ऐ खुदा मजबूर कि फर्याद है...
ती डोळे मिटून गात असते. जणू खरंच ती खुदाशी काही बोलत असते. बिछडे सभी बारी बारी या न्यायाने सगळ्यांनी साथ सोडली. कुटुंब असूनही मुबारक कलावंत म्हणून एकाकीच आहे.
विझलेल्या अवस्थेत मुबारक पलंगावर बसून असते. फोन खणखणला की कोणी मदत देण्यासाठी केला असेल या आशेने ती उचलते. जिन्यावर पावलं वाजली की कुणी चाहता मदत घेऊन आला असेल असे तिला वाटते. हे कसलं मुबारक जीणं. 'आप तो मेरे पॅâन हो.' मुबारक अंदाज घेत बोलत असते. 'आप मेरा प्रोग्राम रखो ना .लोकांना माझं गाणं ऐकायचंय, तुम करोगे इतना मेरे लिये...?'
मुबारकच्या प्रश्नाचं उत्तर मनातच राहिलं. उगाच भेटलो असं झालं. कभी तनहाइयो में...ऐकताना आता मदतीसाठी विनवणी करणारी मुबारकच डोळ्यासमोर येत राहणार...
जिने उतरताना तिचंच 'देवदास'चं गाणं आणि त्यातल्या या ओळी आठवत राहातात...
अगर इस जहां का मालिक
कही मिल सके तो पुछे
मिली कौनसी खता पर हमे इस कदर सजाये ...
मेरी हसरतों से कह दो कि ये ख्वाब भूल जाये....